PM मोदींचा देशातील लाभार्थ्यांशी संवाद कार्यक्रम; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 05:14 PM2022-05-31T17:14:09+5:302022-05-31T17:16:02+5:30

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्‍या कल्याणकारी योजनेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिमला (हिमाचल प्रदेश) येथून देशव्यापी संवाद साधला.

PM Modi's interaction program with beneficiaries in the country; The Chief Minister Deputy Chief Minister interacted with the beneficiaries | PM मोदींचा देशातील लाभार्थ्यांशी संवाद कार्यक्रम; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद

PM मोदींचा देशातील लाभार्थ्यांशी संवाद कार्यक्रम; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद

           
अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशव्यापी संवाद कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील पाच जिल्ह्यांतील प्रत्येकी 3 लाभार्थ्यांशी संवाद साधला. यात अहमदनगर जिल्ह्यातील दरेवाडी, लोणी बु. आणि चांदेगांव येथील लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी आस्थेवाईकपणे साधलेल्या संवादाने लाभार्थी भारावून गेले. शासनाने घरकुल योजनेसह महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजनेचा लाभ दिला आहे. त्यामुळे जीवनमान जगणं सुकर झालं. अशी भावना या लाभार्थ्यांनी व्यक्त केली.
            
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्‍या कल्याणकारी योजनेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिमला (हिमाचल प्रदेश) येथून देशव्यापी संवाद साधला.
            
या संवाद कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्‍याच्‍या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्‍न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरीत्या पोहचविल्या यात आनंद व समाधान आहे. असे मुख्‍यमंत्री ठाकरे म्‍हणाले.
            
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त केंद्र सरकारच्या पोर्टलवर सर्वाधिक उपक्रमात महाराष्ट्र देशात पहिला आला आहे. अडीच लाख कार्यक्रमांची नोंद राज्याने केली आहे. असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी नमूद केले .
            
अहमदनगर येथील माऊली सभागृहात जिल्ह्यातील 260 लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. हा संवाद कार्यक्रम जिल्ह्यात तीन टप्प्यांत झाला. पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण/शहरी), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, मातृवंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण/शहरी), जल जीवन मिशन, अमृत स्वनिधी योजना, एक राष्ट्र एक रेशनकार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्यमान भारत हेल्थ अॅंड वेलनेस सेंटर, मुद्रा योजना या योजनांची माहिती दिली. या योजनेत अहमदनगर जिल्ह्याने केलेल्या प्रगतीची आकडेवारीसह महिती सादर केली.
            
दुसऱ्या टप्प्यात राज्यस्तरावरील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे सह्याद्री अतिथीगृह येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद येथील प्रत्येकी तीन लाभार्थ्यांशी संवाद साधला. अहमदनगर तालुक्यातील दरेवाडी येथील मीरा मधुकर कारंडे, राहाता तालुक्यातील लोणी बु. येथील विनोद भाऊसाहेब पारखे आणि राहूरी तालुक्यातील चांदेगांव येथील सुखदेव काशिनाथ उबाळे या पंतप्रधान योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधला. "सर्व योजनांचा लाभ मिळाला आहे. आता काही लाभ मिळणं बाकी राहीलं आहे का?" असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीरा कारंडे यांना‌ विचारला. त्यावर मीरा कारंडे यांनी सांगितले की, पंतप्रधान घरकूल योजनेसह पाच ते सहा योजनांचा लाभ मिळाला आहे‌.शासनानं सर्व काही दिलं आहे. आता काही मागणं राहिलं नाही. विनोद पारखे यांच्याशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री म्हणाले, परिवार कसा आहे. मुलं किती आहेत ? त्यावर विनोद पारखे म्हणाले, एक मुलगी आहे. त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, ठीक आहे, सुखी संसार कर..! अशा स्नेहपूर्ण शुभेच्छा देत उपमुख्यमंत्र्यांनी आस्थेवाईक संवाद साधला.
            
कार्यक्रमात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग गणपत शिंदे, रविंद्र कवडे, चंद्रशेखर धर्माधिकारी, यांनी आपले मनोगत व्यक्त केले‌. स्वातंत्र्य सैनिकांच्या समस्यांवर ‌लवकरच बैठक घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले ‌.
            
या कार्यक्रमाला महापौर रोहिणी शेंडगे, स्वातंत्र्यसैनिकांची कुटुंबीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी, नागरी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: PM Modi's interaction program with beneficiaries in the country; The Chief Minister Deputy Chief Minister interacted with the beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.