अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर असून दुपारी १ वाजता त्यांचे शिर्डीत आगमन झाले. त्यावेळी, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर, मोदींनी शिर्डीतील साई मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. या दौऱ्यात नरेंद्र मोदींच्याहस्ते ७५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे. तसेच, ८६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ आणि निळवंडे धरणाचे जलपूजन करून कालव्याचे लोकार्पण होईल.
मोदींनी शिर्डीत आल्यानंतर श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा केली. येथील दर्शनानंतर मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही मोदींच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर, पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन आणि धरणाच्या कालव्याचे लोकार्पण सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत. तेथून शिर्डी येथील एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून मोदींच्याहस्ते आरोग्य, रेल्वे, रस्ते आणि तेल व वायू यांसारख्या क्षेत्रातील सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी होत आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००८ साली आणि देशाचे पंतप्रधान झाल्यावर २०१८ साली नरेंद्र मोदी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आज तिसऱ्यांदा ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले आहेत. त्यामुळे, आज ५ वर्षांनी नरेंद्र मोदींनी साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर, आज पाच वर्षांनी वातानुकूलित दर्शन रांगेचे लोकार्पणही नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. ज्याची पायाभरणीही त्यांनीच केली होती.
मोदींच्याचहस्ते पायाभरणी अन् उद्घाटनही
शिर्डी येथील साईबाबा मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुल म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अत्याधुनिक अशी भव्य इमारत असून येथे दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी आरामदायी प्रतिक्षालय बांधण्यात आले आहे. १० हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसनक्षमतेसह या इमारतीत अनेक सुसज्ज प्रतिक्षालये आहेत. यामध्ये कपडे बदलण्यासाठी खोल्या, स्वच्छतागृह, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्र इत्यादी वातानुकूलित सार्वजनिक सुविधांची तरतूद आहे. पंतप्रधानांच्या हस्ते ऑक्टोबर २०१८ मध्ये या दर्शन रांग संकुलाची पायाभरणी झाली होती.