अहमदनगर : दिवंगत माजी केंद्रीय मंत्री व राज्यातील मात्तबर नेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’, या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हचर््युअल पद्धतीने येत्या दि. १३ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.विखे यांचे पुत्र व राज्याचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी ही माहिती दिली. या कार्यक्रमासाठी प्रवरानगर येथील डॉ़ धनंजय गाडगीळ सभागृहात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.आपल्या वडिलांनी १९६२ पासूनचा त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीचा ऐतिहासिक दस्ताऐवज या आत्मचरित्रात मांडला आहे. तत्कालीन राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांवर रोखठोक भूमिका देखील त्यांनी या पुस्तकात मांडली आहे. त्यांच्या हयातीत या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, त्यांच्या आजारपणामुळे ते शक्य झाले नाही. आता स्वत: पंतप्रधान पुस्तकाचे प्रकाशन करणार असल्याचे राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
विखेंच्या आत्मचरित्राचे मोदींच्या हस्ते प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 4:29 AM