श्रीगोंदा : येथील श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयामध्ये पार पडलेल्या काव्यवाचन स्पर्धेत गौरी बायकर, प्रांजल दळवी यांच्या कविता वेगवेगळ्या गटांत नंबर वन ठरल्या.
लहान गटात गौरी बायकरच्या ‘आई’ कवितेने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक श्रावणी शिर्केची ‘तुलना’ आणि तृतीय क्रमांक श्रावणी लकडेची ‘करार आयुष्याशी’ यांनी मिळविला.
मोठ्या गटात प्रांजल दळवीची ‘प्रिय चाचा’ व प्रतीक्षा कुदळेची ‘दैना ऑनलाईन शिक्षणाची,’ द्वितीय क्रमांक लावण्या मोटेची ‘तुमच्यासाठी कायपण’ आणि तृतीय क्रमांक भाग्यश्री बिबेच्या ‘बाबा’ कवितेने मिळविला.
यावेळी अनेक विद्यार्थिनींनी कवितांच्या माध्यमातून विविध विषयांना हात घातला. गरिबी, प्रयत्नवाद, बाबा, राजा शिवछत्रपती, ऑनलाईन शिक्षण, शब्दांचा आविष्कार, निसर्ग, आई, विठ्ठल, आयुष्य, महात्मा फुले, गुरुजी अशा अनेक कविता सादर करण्यात आल्या. चालू घडामोडींतील कोरोना आणि लॉकडाऊन, ऑनलाईन शिक्षण या कविता विशेष दाद मिळवून गेल्या.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. अमोल गवळी व प्रा. शिल्पा जाधव यांनी केले. मुख्याध्यापिका वंदना नगरे, उपमुख्याध्यापिका गीतांजली चौधरी, पर्यवेक्षक दिलीप भुजबळ, गुरुकुलप्रमुख राजेंद्र खेडकर, सुनील दरेकर, नितीन खेतमाळीस उपस्थित होते. या काव्यस्पर्धेचे आयोजन, नियोजन व सूत्रसंचालन धनंजय देशमुख यांनी केले. शीतल राऊत यांनी आभार मानले.