म्हैसगाव : नवरात्राच्या उपवासाला भगरीच्या पीठाचे पदार्थ खाल्याने १७ जणांचा विषबाधा झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील म्हैसगाव परिसरात शनिवारी रात्री घडली. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारली आहे. म्हैसगाव व परिसरातील कोळेवाडी ताहराबादमध्ये नवरात्रीच्या उपवासामध्ये भगरीचा वापर केला जातो. उपवासाचा पहिला दिवस असल्याने शनिवारी रात्री अनेकांनी भगरीच्या पीठाचे पदार्थ केले. यानंतर अनेक महिलांना व पुरुषांना उलटी, जुलाब, मळमळ होणे, चक्कर येणे अशा प्रकारचा त्रास होवू लागला. खाजगी डॉक्टरकडे जावून त्यांनी उपचार घेतले. रात्री उशीरा रुग्णांची संख्या वाढू लागली. लक्षणे ही सर्व रुग्णांना सारखी दिसत असल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी काय खाल्ले ही चौकशी केल्यावर ही बाब उघड झाली. म्हैसगाव येथील खाजगी डॉक्टरांकडे जवळपास १५ महिला व दोन पुरुषांनी उपचार घेतले. शनिवारी रात्री काही महिलांना त्रास जाणवू लागला. सर्व रुग्णांना सारखेच लक्षणे दिसत होती. त्यांच्यावर तातडीने उपचार केले आहेत. खाद्य पदार्थातून हा प्रकार झाला आहे, असे डॉ. एम. डी. कवडे यांनी सांगितले.
|
भगरीच्या पीठातून १७ जणांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 2:46 PM