राहुरी : कोल्हार खुर्द येथील परिगाबाई खर्डे यांच्या घरात चक्क बिबट्यानेच घरोबा केल्यामुळे मोठा खळबळ उडाली. ही माहिती वा-यासारखी सर्वत्र पसरली अन् वन खात्याचे राहुरी, नगर व नाशिक येथील पथके खर्डे यांच्या घरी दाखल झाली. तब्बत १४ तासानंतर शुक्रवारी दुपारी बिबट्या पिंज-यात जेरबंद झाला. जेरबंद झालेल्या बिबट्याला डिग्रस (ता़ राहुरी) येथील शासकीय नर्सरीत रवाना करण्यात आले.कोल्हार खुर्द परिसरात असलेल्या मुंजाबानगर येथील भरवस्तीत असलेल्या परिगाबाई खर्डे यांच्या घरात बिबट्या घुसला़ त्यामुळे खर्डे यांनी घराला कुलुप लावून बिबट्याला कोंडून घेतले़ समोरून असलेली खिडकी वन विभागाच्या कर्मचा-यांनी पॅक केली. राहुरीचे वनक्षेत्रपाल उमेश वाघ यांनी अहमदनगर येथील उपवनसंरक्षक ए़ श्री़ लक्ष्मी व आऱ जी़ देवखिळे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.शुक्रवारी पहाटे जुन्नरवरून डॉक्टरांचे पथक कोल्हार खुर्द येथे दाखल झाले. ए़ श्री़ लक्ष्मी या घटनास्थळी दाखल झाल्या़ वन खात्याच्या कर्मचा-यांनी घराचे पत्रे खोलले. तरीदेखील बिबट्या बाहेर येण्याचे टाळत होता़ अखेर वन खात्याने बिबट्यावर पाण्याची फवारणी केली़ त्यानंतर बिबट्या पिंज-यात जेरबंद झाला़राहुरी तालुक्यात बागायती पट्ट्यात उसामध्ये बिबट्याचे वास्तव्य आहे़ गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे़ शेतक-यांची जनावरे फस्त करणारा बिबट्या पहिल्यांदाच भरवस्तीत असलेल्या घरात घुसला़ त्यामुळे परिसरात घबराट पसरली़ बिबट्याला पाहण्यासाठी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती़ बिबट्या सुखरूप असल्याची माहिती वन विभागाचे लोंढे यांनी दिली.
असा झाला बिबट्या जेरबंद..घराच्या दरवाजासमोर रिकामा पिंजरा ठेवण्यात आला़ पिंज-याचा दरवाजा उघडण्यात आला़ घरामध्ये पाणी सोडण्यात आले़ पाण्यामुळे चवताळलेला बिबट्या थेट दरवाजातून बाहेर पडून अलगद पिंज-यात अडकला़ पिंज-यात बिबट्या जेरबंद होताच वन कर्मचाºयांचा जीव भांड्यात पडला.परिगाबाई खर्डे या वृद्धा घरात असतानाच बिबट्याच त्यांच्या घरात घुसला़ बिबट्याची चाहूल लागताच खर्डे यांनी बिबट्याची नजर चुकवून घराबाहेर धाव घेतली व आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खर्डे यांच्या घराकडे धाव घेतली. घरात बिबट्या पाहून त्यांनी दरवाजा बंद करुन कुलूप लावले. त्यानंतर वन कर्मचारी तेथे आले.