संगमनेर : अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.०६) सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील बक्कर कसाब मस्जिदजवळ, कसाईवाडा येथे कारवाई केली. या कारवाईत १ लाख २० हजार ५०० रुपये किमतीचे ६०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. या प्रकरणी ८ जणांविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शफिक महंमद कुरेशी (वय ३२, रा गल्ली क्रमांक ९, जमजम कॉलनी, संगमनेर), शेहबाज गुलफाम कुरेशी (वय ३२, रा. मोगलपूरा, संगमनेर), मुजाहित उर्फ मुज्जू दौला कुरेशी, हारुण सुलतान कुरेशी, कलीम जलील कुरेशी, शाहिद इर्शाद कुरेशी, उमर शकुर कुरेशी, खलील बुढन कुरेशी (सर्व रा. मोगलपूरा, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या ८ जणांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस नाईक सचिन दत्तात्रय अडबल यांनी फिर्याद दिली आहे.
संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांचे संदर्भात माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, पोलिस नाईक अडबल, पोलिस कॉन्स्टेबल आकाश काळे, मच्छिंद्र बर्डे, अमृत आढाव यांनी ही कारवाई केली.