श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : तालुक्यातील माळवाडगाव येथील आरोपीकडून शहर पोलिसांनी चोरीस गेलेल्या सात मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यातील मोटारसायकलचा देखील समावेश आहे. आरोपीचे नाव गणेश संजय खुरासणे (वय २३) असे आहे. त्याच्याकडून ५ लाख ९० हजार रुपये किमतीच्या मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतल्या. खुरासणे याला अटक करण्यात आली आहे.
खंडाळा परसोड (वैजापूर, जि. औरंगाबाद) येथील सोपान जयराम सोनवणे हे त्यांच्या मोटारसायकलवर (एम.एच.४१, ए.पी. ०७६६) ७ जून २०१३ या दिवशी अशोकनगगर फाटा येथे मंगल कार्यालयात विवाह समारंभासाठी आले होते. यावेळी त्यांची मोटारसायकल चोरीस गेली. लोकांकडे चौकशी करूनही गाडी मिळून आली नाही.
अखेर शहर पोलिस ठाण्यात सोनवणे यांनी गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे गुन्ह्याच्या तपासात होते. त्यांना आरोपी खुरासणे यांच्याविषयी माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकास गाडीचा शोध घेण्याचे आदेश गवळी यांनी दिले. तपास पथक माळवाडगाव येथे घटनास्थळी जाऊन केलेली पाहणी व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हा आरोपी खुरासणे यानेच केल्याचे निष्पन्न झाले.आरोपीचा गुरुवारी तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने कबुली दिल्याने त्यास तात्काळ अटक करण्यात आली. त्याच्याकडे सखोल तपास केला असता चोरी केलेल्या सात मोटारसायकलची माहिती पोलिसांना दिली. यात औरंगाबाद, शिर्डी, कोपरगाव येथील वाहनांचा समावेश आहे.