अकोले : पाऊस कमी झाल्याने यंदा भंडारदार धरणाचा ‘ओव्हर फ्लो’चा १५ आॅगस्टचा मुहूर्त टाळला आहे. तरीही भंडारदरा परिसराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. १५ आॅगस्टला दरवर्षी पर्यटकांची मोठी गर्दी होते़ त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासन, कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य वन्यजीव व वन विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या मदतीने पर्यटकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. राजूर व वारंघुशी, वाकी बंगला येथे चेक पोस्ट तयार करण्यात आले असून मद्यपी आणि मद्य वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे़ या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेण्यात येणार आहे. येथे एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे़ वाकीमार्गे घाटघर-रतनवाडी-भंडारदरा धरण-रंधा धबधबा अन् परतीचा प्रवास असा ‘रिंग रोड’ सफर पर्यटकांसाठी निश्चित करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
पोलीस प्रशासनाची पर्यटनासाठी तयारी!
By admin | Published: August 13, 2015 10:56 PM