अहमदनगर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांची पाच जणांनी टोळी शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. बु-हाणनगर परिसरातील व्हिडिओकॉन कंपनीच्या गेटजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोन आरोपी पसार झाले.ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून तीन मोटारसायकल, एक गावठी बनावीटीची एअर गन, दोन लोखंडी कटावणी, दोन लाकडी दांडे, ४ मोबाईल असा एकूण १ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दत्तात्रय पद्माकर माळी (वय २८ रा. गळनिंब ता. श्रीरामपूर), श्याम रामदास जाधव (वय २६ रा. संकापूर ता. राहुरी), सचिन हेमंत जाधव (वय २० रा. पिंपळगाव फुणगी ता. राहुरी), धनराज सुरेश केदारी (वय २० रा. राहुरी खुर्द ता. राहुरी) भरत मार्कस जाधव (वय २२ रा. पिंपळगाव फुणगी) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. कारवाईदरम्यान विशाल विजय बनसोडे (रा. पिंपळगाव फुणगी) व महेश तुळशीराम मोरे (रा. गळनिंब) हे दोघे फरार झाले. दरोड्याच्या तयारीत असताना पथकाने पाच जणांना ताब्यात घेतले़ विशाल बनसोडे, भरत जाधव, सचिन जाधव व श्याम जाधव यांच्यावर श्रीरामपूर, संगमनेर व लोणी पोलीस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हे चोरटे शेतक-यांचे वीजपंप चोरून नेत होते. त्यांनी १३ गुन्ह्यांची कबुली दिली असून, चौकशीत या पाच जणांकडून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आरोपींवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे हे करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह उपनिरीक्षक गुठ्ठे, कॉन्स्टेबल मन्सूर सय्यद, सोन्याबापू नानेकर, दत्तात्रय हिंगडे, फकीर शेख, मनोहर गोसावी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, विशाल दळवी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
बु-हाणनगर परिसरात सराईत गुन्हेगारांची टोळी पकडली; दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 10:02 PM