कोपरगाव (जि. अहमदनगर) : कोरोनामुळे नाशिक- कोपरगाव सरहद्दीवर येसगाव येथील चेकपोस्टवरील कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस हवालदारास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. विजय अर्जुन पाटील असे मारहाण झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.शुक्रवारी (दि.१२) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पप्पू उर्फ संतोष पुंडलीक सोनवणे ( रा. खिर्डीगणेश ता. कोपरगाव ) यास अटक करून त्याच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय पाटील यांनी फिर्यादित म्हंटले आहे की, शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून येसगाव येथील चेकपोस्ट येथे पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे, होम गार्ड ज्ञानेश्वर भुजाडे, पवन आढाव, मोहन कापसे व मी आम्ही ड्युटीवर होतो. रात्री सव्वा आकराच्या सुमारास एक चारचाकी गाडी येवलाकडून कोपरगावकडे जात होती. ती चेक पोस्टवर येऊन थांबली. गाडीतून पप्पू उर्फ संतोष पुंडलीक सोनवणे (रा.खिर्डी गणेश ता. कोपरगाव ) खाली उतरला. त्याचवेळी मी माझ्या पत्नीचा फोन आल्याने मी फोनवर बोलत होतो. सोनावणे हा माझ्या दिशेने आरडाओरड करत आला. त्याने माझ्या युनिफॉर्मची कॉलर पकडली. त्याने तोंडाला मास्कही लावलेले नव्हते. त्याच्या एका हातात काठी होती. त्याने माझी कॉलर पकडून म्हणाला, तुम्ही दोन महिन्यापासून लई मजा मारत आहे. तुम्ही इथे कसे काय चेकपोस्ट लावले ? कशा काय गाडी अडवतात ? असे म्हणून त्याने युनिफॉर्मची कॉलर ओढून बटन तोडले. तसेच युनिफॉर्मची लाईन यार्ड देखील तोडली. तसेच डाव्या पायाच्या घोट्याजवळ काठीने फटका मारला. उजव्या डोळ्यात जवळ बुक्का मारून मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मोठ्याने शिवीगाळ करून सकाळपर्यंत तू राहणार नाही. तुला रात्रीतून खाल्लास करून टाकतो. माझ्याकडे बंदूक आहे. तुला गोळी घालून मारून टाकतो, अशा धमक्या दिल्या. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी माझी सोडवणूक केली. सरकारी गाडी बोलावून घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके करीत आहेत. दरम्यान त्याच्याकडील एसक्रॉस ही चारचाकी कार (एम. एच. १४ ए.एक्स. १८८८ ) ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
कोपरगाव तालुक्यात चेकपोस्टवर पोलिसास मारहाण, गुन्हा दाखल, आरोपी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:09 PM