स्वप्नील उर्फ आदित्य अशोक पाखरे (वय २५, रा. नागरदेवळे, ता. नगर), किशोर उर्फ ईश्वर दिलीप शिंदे (वय २४ रा. देहरेल ता. नगर) व महेश मनाजी उर्फ मनोहर शिंदे (रा. विळद) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
या आरोपींसह त्यांच्या साथीदारांनी १० मे रोजी पहाटे वडगावमावळ येथील टेम्पोचालकाची लूटमार केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, नगर-औरंगाबाद रोडसह नगर शहर परिसरात गेल्या काही दिवसांत अशा पद्धतीने लूटमारीच्या घटना वाढल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी विशेष पथकाची स्थापना करून आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनी एका पथकावर या आरोपींना जेरबंद करण्याची जबाबदारी दिली. आरोपींची गुन्हे करण्याची पद्धत माहिती असल्याने पथकाने एक मालटेम्पो घेत आरोपींना पकडण्याचे नियोजन केले. पोलीस कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून शेंडी बायपास रोडवर रात्री टेम्पो घेऊन थांबत होते. लुटारू मात्र काही केल्या येत नव्हते. अखेर मंगळवारी पहाटे लूटमारीच्या उद्देशाने आलेल्या तिघा लुटारूंनी टेम्पो घेऊन थांबलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गळ्याला चाकू लावून पैशांची मागणी केली. याचवेळी इतर पोलिसांनी लुटारुंवर झडप घालून त्यांना जेरबंद केले. या आरोपींकडून लोखंडी कत्ती, एक गिलवर व गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल जप्त केली आहे.
निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक मिथुन घुगे, सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, साहाय्यक फौजदार मन्सूर शेख, पोलीस नाईक संदीप पवार, सुरेश माळी, विशाल दळवी, रविकिरण सोनटक्के, शिवाजी ढाकणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपींचे अनेक गुन्हे आले समोर
अटक आरोपी व त्यांच्या साथीदारांविरोधात भिंगार कॅम्प, एमआयडीसी, तोफखाना, दौंड, संगमनेर. पिंपरी, नगर तालुका आदी पोलीस ठाण्यांमध्ये आर्म ॲक्ट, चोरी, जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
फोटो १९ आरोपी
ओळी- प्रवाशांची लूटमार करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.