भिंगार : नगर शहरातील भिंगार उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या स्वत:चा व कुटुंबीयांच्या बचावासाठी भिंगार पोलिसांनी देखील दक्षता घेतली आहे. पोलिसांनी चक्क भिंगार पोलीस ठाण्याचाच दरवाजा बंद केला आहे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. असे असताना बहुतांश नागरिक बेफिकीर भिंगार परिसरामध्ये फिरत असल्याचे दिसत आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी पोलीस प्रशासन २४ तास परिश्रम घेत आहेत. नागरिकांना सुरक्षिततेचे आवाहन करून मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे अशा सूचना करीत आहेत. तरीही बहुतांशी नागरिक याबाबत बेफिकीरपणे वागत असल्याचे चित्र भिंगारमध्ये आहे.
भिंगार पोलिसांनी आपल्या स्वत:चा बचाव करण्यासाठी पोलीस ठाण्याचा दरवाजाच बंद केला आहे. ठाण्यात तक्रार घेऊन येणाºया नागरिकांची गर्दी टाळण्याकरीता पोलिसांनी बरेच उपाय केले. नागरिकांना समजावून सांगूनही ते ऐकत नसल्याने शेवटी पोलिसांनी भिंगार पोलीस ठाण्याचे दरवाजा बंद केला आहे.
जनतेचे रक्षक पोलीस जर स्वत: आपली व कुटुंबीयांची काळजी घेतात? तर नागरिकांनी का घेऊ नये? असा सवाल निर्माण होत आहे. तरी नागरिकांनी कोरोनाच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन भिंगार पोलिसांनी केले आहे.