आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ २ - गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाचा फटका आता बाजार समिती आणि ग्राहकांना बसू लागला आहे. शुक्रवारी सकाळी पोलीस संरक्षणात बाजार समितीचे काम सुरु झाले़ मात्र, आवक अवघी ५ टक्के झाल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले़नगर बाजार समितीत येणारा शेतीमाल शेतकऱ्यांच्या संपामुळे शेतातच पडून आहे. त्यात ठिकठिकाणी सुरु असलेल्या चक्काजाममुळे बाहेरुन बाजार समितीत येणारा माल रस्त्यातच अडकून पडला. यामुळे संपाच्या दुसऱ्या दिवशी बाजार समितीत फळांची आवक अवघी ३२ क्विंटल तर भाजीपाल्याची आवक फक्त ४५ किलो इतकी झाली. सरासरीच्या तुलनेत ही आवक जेमतेम ५ टक्के इतकी आहे. संपामुळे नगर बाजार समितीला ५ लाखांचा आर्थिक फटका बसला आहे. भाज्यांची आवक एकदम कमी झाल्याने भाज्यांचे भाव पार गगनाला भिडत आहे. आज कोथंबीरची एक जुडी ५ रुपयावरून थेट ५० रुपयापर्यंत पोहोचली तर पालकाची एक जुडी ५ रुपयावरून २५ रुपयांपर्यंत महागली. इतर भाज्यांचेही भावही कडाडल्याने ग्राहकांना या भाव वाढीचा फटका बसत आहे. बाजार समितीचे सर्व व्यवहार बंद करण्याबाबत आज शेतकऱ्यांनी बाजार समितीला पत्र दिले. उद्यापासून शेतकऱ्यांचा मोर्चा बाजार समितीकडे वळणार आहे.
पोलीस संरक्षणात नगर बाजार समिती सुरु; आवक अवघी ५ टक्के
By admin | Published: June 02, 2017 3:31 PM