अकोले : शहरातील रहिवासी मात्र नोकरीनिमित्त नाशिक जिल्ह्यात सेवेत असलेला पोलीस व त्यांच्या पत्नीचा कोरोना तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु आहेत. हा पोलीस कर्मचारी गावी आल्यानंतर त्यांच्या घरातील व नातेवाईकांच्या तो संपर्कात आल्याने चिंता वाढली होती. मात्र या कुटुंबातील नातेवाईकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने अकोलेकरांनी निश्वास टाकला आहे. चारही संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभीरे यांनी सोमवारी केले आहे. सदर पोलिसाच्या भाचीच्या कुटुंबास नगर जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तपासणी अहवालात त्यांना कोरोना प्रादुर्भाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर या पोलिसाच्या घरातील १७ जणांना होम क्वारंटाईन केल्याची माहिती वैद्यकीय अधिकाºयांनी दिली आहे.मालेगाव येथे ड्युटी बजावत असणाºया या पोलिसास २२ एप्रिल रोजी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. २३ एप्रिल रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या पत्नीस तपासले असता त्यांचा देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हा प्रकार गेला आठवडाभर गुपित राहिला. त्यांच्या सानिध्यात असलेली त्याची भाची आजारी पडल्याने या कुटुंबाने सावध भूमिका घेत आरोग्य विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर आरोग्य विभागाने तत्काळ तीन जणांना ताब्यात घेऊन शुक्रवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. खबरदारी म्हणून संबंधितांना नगरला हलवले आहे. संंबंधित पोलीस कर्मचारी हे त्यांच्या घरी देखील आले होते म्हणून म्हाळादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुटुंबातील १७ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
‘त्या’ पोलिसाच्या कुटुंब, नातेवाईकांचा अहवाल निगेटिव्ह; अकोलेकरांनी टाकला निश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 4:28 PM