भेंडा : भेंडा बुद्रूक (ता. नेवासा) शिवारात एका शेतक-याच्या शेतात मजुराचा मृतेदह पुरण्यात आला होता. त्या शेतक-याच्या तक्रारीवरून शनिवारी सायंकाळी पोलिसांनी शेतात उकरून तो मृतदेह बाहेर काढला. मृतदेह कुजलेला असल्याने त्याचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.सुभाष रामभाऊ निर्मळ ( वय ५०) रा. निर्मळ पिंप्री, ता. श्रीरामपूर, असे त्या मयताचे नाव आहे. अशिम गोरक्षनाथ अभंग यांनी नेवासा पोलीस ठाण्यात एक तक्रार दिली होती. भेंडा बुद्रूक येथील गट नं. २७५ मधील पडीत शेताच्या वळणालगत तीन ते चार इसम उभे होते. त्यांनी जेसीबी यंत्राच्या सहायाने खड्डा घेतला व त्यामध्ये काही तरी पुरले, असे अभंग यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पोलीस उपनिरिक्षक भरत दाते यांनी सहका-यांसह घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पुरलेल्या जागी उकरले असता ते मृतदेह आढळून आला. अधिक चौकशी केली असता तो मृतदेह सुभाष निर्मळ यांचा असल्याचे समजले. तो येथेच एका शेतकºयाकडे मजूर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. वैद्यकीय अधिकारी रामेश्वर शिंदे यांनी जागेवरच शवविच्छेदन केले.
पोलिसांनी बाहेर काढला शेतात पुरलेला मजुराचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 11:00 AM