अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी दीपक कोलते यांच्या खूनप्रकरणातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी पिन्या कापसे, दत्ता विघ्ने व संतोष बोबडे या तिघांची जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. दीपक रावसाहेब कोलते यांचा ३ फेब्रुवारी २०१७ रोजी खून करण्यात आला होता.
कोलते यांच्या खून झाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल नितीन मिठू भताने यांनी आरोंपीविरुध्द फिर्याद दाखल केली होती. त्यावरून आरोंपीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत कोलते कर्तव्यावर असताना शेवगाव तालुक्यातील मुंगी शिवारात कापसे, विघ्ने व बोबडे यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. कोलते यांना दवाखान्यामध्ये नेत असताना त्यांनी वरील तिघांना हल्ला केल्याचा जबाब दिला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर पिन्या कापसे पसार झाला होता. त्याला बीडमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुध् दोषारोपपत्र दाखल केले होते. साक्षीपुराव्यांच्या गुणदोषावर विचार करून न्यायालयाने तिघांची निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने अँड. सतीश गुगळे, महेश दिवाणे, हेमंत पोकळे, संदीप शेंदूरकर, शाम घोरपडे, विशाल पठारे यांनी काम पाहिले.