अहमदनगर : अवैध प्रवाशी रिक्षा वाहतुकीवर कारवाई करीत असताना पोलिसांनी एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. जुन्या बसस्थानक चौकात बुधवारी सायंकाळी झालेल्या या घटनेनंतर आमदार अनिल राठोड घटनास्थळी पोहोचले. यावेळी राठोड आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या प्रकरणी रिक्षाचालक आणि राठोड यांनी पोलिसांविरुद्ध पोलीस उपअधिक्षक वाय.डी. पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान या प्रकारामुळे रिक्षाचालकांनी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.जुन्या बसस्थानक (इंम्पिरिअल)चौकात शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांची अवैध रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई सुरू होती. यावेळी अनेक प्रवाशी चौकात वाहने मिळविण्यासाठी थांबली होती. त्यांना घेण्यासाठी रिक्षा चालकांमध्ये स्पर्धा सुरू होती. यावेळी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी प्रवाशांनाच रिक्षामध्ये बसण्यासाठी मनाई केली. यावेळी काही प्रवाशांनी थेट आमदार राठोड यांच्याकडे तक्रार केली. राठोड तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत पोलिसांनी रिक्षाचालकांची धरपकड सुरू केली होती. यामध्ये एका रिक्षाचालकाला पोलिसांनी बेदम मारहाण केली. यावेळी दोनशे ते तिनशे लोकांचा जमाव चौकात जमा झाला. राठोड आणि पोलीस निरीक्षक ढोकले यांच्यामध्ये वाद झाले. ढोकले यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे. राठोड यांनी पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांच्याकडेही तक्रार केली. उपअधिक्षक पाटील यांची भेट देवून मारहाणीबाबत संताप व्यक्त केला.