हरवलेल्या व्यक्ती, घरातून पळवून नेलेले अल्पवयीन मुले, तसेच बेवारस मुलांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १ ते ३० जूनपर्यंत पोलीस दल, बालकल्याण समिती व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ऑपरेशन मुस्कान राबविले जात आहे. जिल्ह्यात २०१५ पासून १३५ अल्पवयीन मुलांचे अपनयन झाल्याची नोंद आहे, तर २ हजार ७२ महिला-पुरुष मिसिंग आहेत. गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून २३ अल्पवयीन मुलांचा शोध घेतला आहे. यात १५ मुली, ३ मुले, तर रेकॉर्डव्यतिरिक्त ५ अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात आला आहे. मिसिंग तक्रारीमधील ११६ महिला, ५६ पुरुष यांचा शोध घेण्यात आला असून, यामध्ये माता-पित्यांसोबत असलेल्या १२ बालकांचाही समावेश आहे. शोधून काढलेल्या अल्पवयीन मुलांना बालन्याय मंडळाकडे दाखल केले जाते त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवून या मुलांना पालकांच्या स्वाधीन केले जाते. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ऑपरेशनचे नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक मसूद खान, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे हेड कॉस्टेबल एस. बी. कांबळे, ए. आर. काळे, पोलीस नाईक ए. के. पवार, एम. के. घुटे, सी.टी. रांधवन, आर. एम. लोहाळे, एस. एस. काळे यांचे पथकही मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
----------------------
अपहरणाच्या प्रकरणात मुलींची संख्या जास्त
लग्न, प्रेम व शहरात राहण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे जिल्ह्यात मोठे प्रमाण आहे. अशा प्रकरणांत कलम ३६३ अंतर्गत अपनयनचा गुन्हा दाखल केला जातो. पाेलिसांनी शोधलेल्या बहुतांशी अल्पवयीन मुली या प्रियकराच्या भूलथापांना बळी पडून घरातून निघून गेलेल्या आहेत.
-------------------
जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन मुस्कान राबविले जात असून, अपनयन झालेले अल्पवयीन मुले व मिसिंग व्यक्तींचा जास्तीत जास्त शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पथक काम करीत आहे. कार्यवाहीबाबत दररोज सर्व पोलीस स्टेशनला सूचना दिल्या जात आहेत.
-मसूद खान, नोडल अधिकारी, ऑपरेशन मुस्कान