शुक्रवारी सायंकाळी औरंगाबादहून पुण्याकडे दारूने भरून चाललेला ट्रक अहमदनगर येथील एमआयडीसी परिसरातून अज्ञात चार चोरट्यांनी पळवला. ट्रक राहुरीच्या दिशेने पळाला असल्याची माहिती नियंत्रण कक्षावरून पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना कळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करत दोन स्वतंत्र पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ, नीरज बोकील, हवालदार अजिनाथ पाखरे, लक्ष्मण बोडखे, उत्तरेश्वर मोराळे, वैभव साळवे, सचिन ताजने आदींनी राहुरी खुर्द येथे सापळा लावला. मात्र भरधाव पळणारा हा ट्रक पुढे निसटला. येथून पुढेही पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवला. सिनेस्टाईल सुरू असलेल्या पाठलागादरम्यान कोल्हार खुर्द पुलाजवळ चालक लक्ष्मण बोडखे यांनी त्या ट्रकला गाडी आडवी लावली तर लगेच दुसऱ्या गाडीतील चालक अजिनाथ पाखरे यांनी पाठीमागे दुसरी गाडी लावली. त्याचबरोबर वैभव साळवे यांनी त्या चालकावर झडप घातली तर त्या भामट्याने साळवे यांच्यावर चाकूचे सपासप वार केले. यात पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आणि तो भामटा अंधाराचा फायदा घेत निसटला. राहुरी पोलिसांनी या कारवाईत ४५ लाखांचा मुद्देमाल एमआयडीसी पोलिसांकडे सुपूर्त केला.
पोलिसांनी पकडला दारूचा ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:18 AM