शिर्डी : मंत्री धनंजय मुंडे प्रकरणी शोध घेऊन यातील सत्य जनतेसमोर आणण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिसांनी ती पार पाडावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.
मुंडे यांच्यावर एका महिलेने केलेले आरोप हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे की, तिच्यावर खरेच अत्याचार झाले आहेत, हे समोर यायला हवे, असेही वाघ म्हणाल्या.
चित्रा वाघ यांनी गुरुवारी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सायंकाळी साई दरबारी हजेरी लावली.
दर्शनानंतर त्या म्हणाल्या, मंत्री मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी अशा स्वरूपाची तक्रार आपल्याविरुद्ध दाखल होण्याची शक्यता आहे, अशा आशयाचे पत्र पोलिसांत दिले होते. त्यामुळे या महिलेची तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशी करून नंतर याबाबत निर्णय घ्यायचा, असे पोलिसांनी ठरविले आहे. दरम्यान, आज काही अन्य लोकांनी याप्रकरणी या महिलेकडून आपल्याला असाच अनुभव आला असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणावे, असे त्या म्हणाल्या.