विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील नव्यानेच मुंबई पोलीस सेवेत रुजू झालेले तान्हाजी दामोदर शिंदे हे मुंबईहून सुट्टीवर आले आहेत. परंतु ते सोमवारी गावात आल्यावर घरी न जाता स्वत:हून थेट संस्थात्मक विलगीकरण कक्षात क्वारंटाईन झाले.
विसापूरमध्ये १ मे नंतर पुणे, मुंबईसह जिल्ह्याबाहेरुन १४ व्यक्ति आल्या आहेत. यासाठी कोरोना ग्रामसुरक्षा समिती,आरोग्य कर्मचारी व तालुका पातळीवरील प्रशासकीय अधिकाºयांनी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शिंदे यांनी भारतीय सैन्यात २०१४ पर्यंत सेवा केली. सेवानिवृत्तीनंतर दोन महिन्यांपासून ते मुंबई पोलीस सेवेत रुजू झाले आहेत. शिंदे हे गावी सुट्टीवर आले. ते आले असेच घरापासून जवळ असलेल्या शिंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्वारंटाईन झाले. मित्र व त्यांच्या दोन मुलांनाही ते क्वारंटाइन कक्षाच्या आसपास फिरून देत नाहीत. त्यांची विसापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या कर्मचा-यांनी आरोग्य तपासणी केली आहे.
बाहेरगावाहून आल्यावर क्वारंटाईन होण्यासाठी आपल्याला कमीपणा वाटण्याचे काहीही कारण नाही. आपल्या कुटुंब व परिसरातील लोकांना कोरोनाचा धोका होऊ नये. यासाठी शंका नको म्हणून प्रत्येकाने यंत्रणेला त्रास न देता स्वत:हून क्वारंटाईन झाले पाहिजे. याचा विचार मी सर्व प्रथम केला. त्यामुळे मुंबईहून गावात आल्यावर घराकडे न जाता सरळ शाळेत क्वारंटाईन झालो, असे तानाजी शिंदे यांनी सांगितले.