कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या २७२ जागांसाठी १११ मतदान केंद्रांत शुक्रवारी (दि. १५) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यात सुमारे ८२.१८ टक्के मतदान झाले. एकूण ६३ हजार ८८७ इतक्या मतदारांपैकी ५२ हजार ४९३ मतदारांनी आपली मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील ६११ उमेदवारांचे राजकीय भवितव्य हे मतदान यंत्रांत बंद झाले असून सोमवारी (दि. १८) मतमोजणीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक तालुक्यातील सर्वच मातब्बर नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यातच माजी मंत्री शंकरराव कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची ग्रामपंचायत असलेल्या येसगाव ग्रामपंचायतीमध्ये आमदार आशुतोष काळे व कोल्हे यांच्यात सरळ दुरंगी लढत होती. दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकनियुक्त सरपंचांच्या निवडणुकीत आमदार काळे यांचे गाव असलेल्या माहेगाव देशमुख येथे कोल्हे गटाचा सरपंच जनतेतून निवडून आला होता. तो पराभव काळे यांना राजकीय शह देणारा ठरल्याने यंदाच्या निवडणुकीत काळे यांनी येसगाव ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याची चर्चा होती. तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे सूत्र हे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हाती होते तर संवत्सर ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या विरोधात काळे व कोल्हे यांनी दंड थोपटून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे येथे सरळ तिरंगी लढत होती. त्यात प्रत्यक्षात आमदार काळे यांनी संवत्सरमध्ये वारंवार बैठका घेऊन प्रचार केला तर याउलट कोल्हे यांनी सावध पवित्रा घेत संवत्सरमध्ये एकदाही पाऊल न ठेवता आपल्या शिलेदारांमार्फतच प्रचाराची मोट बांधली. त्यामुळे या सर्व धामधुमीत जनता कोणाला व किती कौल देणार हे १८ जानेवारीला चित्र स्पष्ट होईल.
......
२९ गावांत शांततेत मतदान...
सर्वच ग्रामपंचायतींमध्ये पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता, मतदान शांततेत पार पडले. यासाठी पोलीस प्रशासनासह निवडणूक शाखेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
...................
फोटो१५- मतदान निवडणूक, कोपरगाव
150121\img_20210115_161545.jpg
कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे मतदारांनी रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.