जामखेड : कोरोना प्रतिबंधासाठी तहसील कार्यालयात प्रशासन, व्यापारी व काही पक्ष संघटनेच्या वतीने पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जनता कर्फ्यूला राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला होता. दरम्यान यातून शिवसेना, भाजपा, राष्टÑीय समाज पक्षाने आपल्याला याबाबत कोणी विश्वासात घेतले नसल्याने बंदमधून दूर राहणे पसंत केले आहे. आजच्या (१० आॅगस्ट) जनता कर्फ्यूला व्यापारी, व्यावसायिकांंनी ९० टक्के प्रतिसाद दिला आहे.
जामखेड तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. कोणीतरी दोन चार व्यापारी प्रशासनाबरोबर बैठक घेऊन पाच, सहा दिवसाचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतात. यात जनतेची कुचंबणा केली जाते. लॉकडाऊन करण्यापेक्षा एखादे कोवीड सेंटर उभा करा. एखादे पेशंट नगरला गेले तर तेथे बेड शिल्लक नाही. ते येथे उपलब्ध करुन उपचाराचा मार्ग स्वीकारावा. कोरोना संदर्भात जनजागृती करा आणि कोरोनाबरोबर जगण्यासाठी लॉकडाऊन पर्याय नाही. संभाजी ब्रिगेड या गोष्टीचा निषेध करीत आहे. रविवारपासून होणारा लॉकडाऊन कोणी पाळू नये, असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांंनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरूण जाधव म्हणाले, महाराष्ट्रात कुठेही लॉकडाऊन नसताना काही व्यापारी एकत्र येऊन बळजबरीचा लॉकडाऊन करण्यास प्रशासनास भाग पाडतात. जनता कर्फ्यू म्हणून जाहीर करतात. यामुळे गोरगरीब नागरिक व छोट्या व्यवसायिकांचे हाल होतात. अगोदरच तीन महिने लॉकडाऊन झाल्याने जगणे मुश्किल झाले आहे. त्यात हा ५ दिवसाचा बंद जामखेडकरांना वेटीस धरणारा आहे. सर्व व्यापारी, व्यवसायिक व जनतेने उद्यापासून आपली दुकाने कोरोना नियमांचे पालन ठेवून चालू ठेवावीत, असे जाहीर केले.
स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी व्यापा-यांनी बंद न पाळता शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.
जनता कर्फ्यूबाबत प्रशासन व व्यापारी यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. सध्या कोरोना रूग्ण वाढत आहेत. नगर येथे आॅक्सीजन मिळत नाही. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेचे आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी सांगितले.
जनता कर्फ्यूचा निर्णय व्यापारी व काही संघटना यांनी घेतला आहे. तो प्रशासनाचा निर्णय नाही. जे दुकाने उघडी राहतील. त्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले की नाही? याबाबत मुख्याधिकारी व आम्ही तपासणी करणार आहोत. जे दुकानदार नियम पाळणार नाहीत. त्यांच्यावर दंडात्मक व शासकीय मार्गदर्शनानुसार कारवाई केली जाणार आहे, असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.