अहमदनगर : मनपातील सत्ताधाऱ्यांकडून प्रोफेसर चौकातील भाजी, फळ विक्रेते, गाळेधारक, स्थानिक रहिवाशांना मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करीत वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. यामध्ये निव्वळ श्रेय लाटण्यासाठी राजकारण केले जात असल्याचा घाणाघाती आरोप, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात काळे यांनी म्हटले आहे की, प्रोफेसर चौकातील गोरगरीब भाजी - फळ विक्रेत्यांवरील अन्यायकारक कारवाई विरोधात शहरातील काँग्रेस धावून गेली. मात्र यामुळे काही मंडळींच्या पोटात पोटशूळ उठला. यामुळे काही मंडळी पडद्यामागून सूत्र हलवत आहेत. हा प्रश्न सोडविण्याचे श्रेय कोणाला घ्यायचे असेल तर त्यांनी ते जरूर घ्यावं. त्याबाबत आमची काही हरकत नाही. पण श्रेयासाठी राजकारण करत सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे पाप कुणी करू नये.
काळे म्हणाले की, हा चौक रहदारीचा चौक आहे. या चौकामध्ये अनेक गाळेधारकांनी मोठ्या रकमांचे बँकांकडून कर्ज काढून गाळे घेतले आहेत. गाळेधारकांचे आणि भाजी - फळ विक्रेत्यांचे मध्यंतरी काही कारणावरून वाद झाले होते. काँग्रेस पक्षाने यशस्वी मध्यस्थी करत सामंजस्याने तोडगा काढत भाजीवाल्यांना कृष्ठधाम रोडवरील मोकळ्या जागेमध्ये बसवण्याचा पर्याय समोर ठेवला होता. गाळेधारक, स्थानिक रहिवाशांसह त्याला अनेक भाजी विक्रेत्यांनी सहमती दर्शवली होती.
महापौर यांनी देखील तोडगा मान्य करत मनपा अतिक्रमण विभाग यापुढे त्रास देणार नाही अशी सर्वांसमोर ग्वाही दिली होती. मात्र तोंडावर गोड बोलून पडद्या मागून या सर्वांना त्रास देत त्यांना वेठीस धरत राजकारण केले जात असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
दरबारात हजेरी लावावी म्हणून षडयंत्र
हा सगळा डाव भाजी - फळ विक्रेते, गाळेधारक, स्थानिक रहिवासी यांनी काहींच्या दरबारात येऊन विनवणी करावी यासाठीच षडयंत्र रचून केला जात आहे. आधी स्वतः वातावरण चिघळवून प्रश्न निर्माण करायचा. त्यानंतर आमच्यामुळेच हा प्रश्न सोडवला गेला असा कांगावा करीत श्रेय लाटायचे. यासाठीच हा खेळ सुरू असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी कुणाचे नाव न घेता केला आहे.
अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे काहींच्या दावणीला बांधलेले आहेत ही या शहराची शोकांतिका आहे. वास्तविक पाहता या तिन्ही घटकांना एकमेकांपासून त्रास होणार नाही अशा पद्धतीचा काँग्रेसने काढलेला मध्य मार्ग यशस्वी होत असतानाच निव्वळ श्रेयाचे राजकारण करायचे म्हणून याला खो घालत या तीनही घटकांना वेठीस धरण्याचे काम लोकप्रतिनिधी, मनपातील अभद्र युती करत असल्या बद्दल काळे यांनी तीव्र निषेध केला आहे.
येत्या दोन दिवसात मनपाने कोणाच्याही दबावाला बळी न पडता याबाबत सामोपचाराने योग्य तोडगा काढला नाही तर काँग्रेस आक्रमक होत तीव्र आंदोलन करेल, असा इशारा काळे यांनी दिला आहे.