लोकमत न्यूज नेटवर्क
अकोले : १९८५ साली गाजलेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील ‘तुझे बुुुुलाये ये मेरी बाहे... मेरे ही पास तुझे आना है, तेरे ही साथ मुझे जीना है’ या गाण्याचे चित्रीकरण भंडारदरा धरणाच्या प्रसिद्ध अम्ब्रेला फॉलजवळ झाले. दिवंगत अभिनेत्री मंदाकिनी यातून रुपेरी पडद्यावर ठळकपणे झळकली. तर धरणभिंतीच्या पायथ्याला असलेल्या बागेत ‘सजनी ग... भुललो मी काय जादू झाली... हे ‘भिंगरी’ या मराठी चित्रपटातील सुषमा शिरोमणी व विक्रम गोखले यांच्या अभिनयात साकारलेले गीत आजही अनेकांच्या ओठी आहे.
भंडारदरा धरण परिसरातील एकेकाळचे वैभव असलेल्या या बागेची आता पूर्ण रया गेली आहे. या बागेची प्रचंड दुरवस्था झाली असून, कोविड संकट टळल्यानंतर पर्यटन व्यवसायाला नवचैतन्य मिळण्याकरिता ही बाग पुन्हा विकसित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
अम्ब्रेला फॉल, धरण विमोचक
मोऱ्यांमधून फेसाळणारे चंदेरी प्रपात, उंच घनदाट वनराई, रंगीत फुलांचे ताटवे, बागेतून झुळझूळ वाहणारे पाट, झाडांच्या बुंध्याला चिरेबंदी पार, स्विमिंग पूल, थुईथुई उडणारे कारंजे अशी सुंदर बाग पूर्वी होती.
आता फक्त अम्ब्रेला फॉल दूरवरुन पाहत पर्यटक समाधान मानतात. बागेत कुणी चुकूनही फिरकताना दिसत नाही. त्यामुळे बाग पुन्हा पूर्वीसारखी विकसित केल्यास पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. त्यातून येथील तरुणाईला रोजगारही मिळेल. आदिवासींच्या आर्थिक उन्नतीला हातभार लागेल, असे अपेक्षित आहे.
१९६० साली ‘हम हिंदुस्थानी’ चित्रपटातील गीत रंधा धबधबा व भंडारदरा परिसरात चित्रीत झाले., पौराणिक हिंदी चित्रपट ‘झबक, लावा, हिना, राम तेरी गंगा मैली, प्रेम, कुर्बान, भिंगरी’ अशा अनेक चित्रपटांच्या काही भागांचे चित्रीकरण या निसर्ग कोंदणात झाले आहे. ‘निसर्गराजा’ हा मराठी अल्बमही याठिकाणी तयार झाला आहे.
‘लावा’मधील ‘हम तुम दोनो मिलके, दिल के गीत बनायेंगे’ या गीताची साक्ष असलेली ही बाग पुन्हा नावारुपाला यावी, अशी पर्यटकांची इच्छा आहे.
...........
आदिवासी विकास विभागाच्या निधीतून बाग विकसित करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. यासाठी निधी मिळताच काम सुरू होईल. यातून स्थनिकांना रोजगार उपलब्ध होईल. ब्रिटीशकालीन काच बंगल्याचे नूतनीकरण झाले आहे. बीओटी तत्वावर कृष्णावंती विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार केला जात आहे.
- अभिजीत देशमुख, उपविभागीय अभियंता, भंडारदरा धरण
...........
२८ भंडारदरा धरण,१,२,३,४