नवरात्र उत्सवात कळसूबाई शिखरावर पहिल्या माळेपासून ते दहाव्या माळेपर्यंत म्हणजेच दसऱ्यापर्यंत भाविकांची रीघ लागलेली असते. या शिखरावर जाण्यासाठी वनविभागाने काही ठिकाणी दगडी पायऱ्या बनविल्या होत्या, तर काही अवघड ठिकाणी लोखंडी शिड्या बनविल्या होत्या. या शिड्या बनविण्यात आल्यानंतर काही वर्षांनी या शिड्यांच्या आधारासाठी असणारे लोखंडी रिलिंग तुटले होते. यानंतर २००८-२००९ या कालावधीत या रिलिंगची वनविभागाने लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करून घेतली होती. मात्र अवघ्या दहा ते अकरा वर्ष यांत हे रिलिंग काही ठिकाणी पुन्हा तुटलेले असल्याने कामाचा दर्जा तर दिसून येतोच, पण त्याबरोबर वनविभागाचे याकडे असलेले दुर्लक्षही दिसून येत आहे. बनविण्यात आलेल्या दगडी पायऱ्यांची अवस्थाही काही ठिकाणी बिकट झालेली आहे.
या शिड्यांवरून भाविक आणि पर्यटक चढउतार करत असतात. नवरात्र उत्सवात तर या शिड्यांवर एकाचवेळी चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या भाविक पर्यटकांची गर्दी होत असते. दोन ठिकाणी असणाऱ्या या शिड्यांचे रिलिंग गंजून तुटून गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी नवरात्र उत्सवात होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेता वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातील एका ठिकाणी तर स्थानिकांनी खबरदारी म्हणून लाकडे बांधली आहेत. स्थानिक समितीबरोबरच हजारो भाविक पर्यटकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कळसूबाई शिखरावरील या रिलिंगची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
.........................
कळसूबाई शिखरावर बारी मार्गे जाण्यासाठी दोन ठिकाणी उभारण्यात आलेल्या लोखंडी शिड्यांचे रिलिंग तुटलेले आहे. या शिड्यांवर नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणावर चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या भाविकांची एकाच वेळी गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेता हे दुरुस्तीचे काम तातडीने होणे आवश्यक आहे. याबाबतचा अहवाल आपण वनविभागास सादर करणार आहोत.
- नरेंद्र साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, राजूर