बाळासाहेब काकडे श्रीगोंदा - तालुक्यातील कोरेगावसारख्या दुर्गम दुष्काळी गावातील निरक्षर शेतकरी संजय पवार यांची मुलगी श्रद्धा हिने इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, या क्षेत्रातील पदवीत्तर शिक्षण घेण्यासाठी श्रद्धा अमेरिकेला निघाली आहे. श्रद्धाच्या रुपाने कोरेगावची पहिलीच कन्या परदेशात शिक्षणाची वारी करणार आहे. गरीब शेतकऱ्याची हुशार लेक अमेरिकेला चालल्यामुळे, कोरेगावकर आज हरिनामाच्या जयघोषात श्रद्धाला शुभेच्छा आणि निरोप देणार आहेत.
वडील संजय पवार यांचे शिक्षण सहावी तर आई नंदा ही निरक्षर. या पवार दाम्पत्यास स्वप्नील व श्रद्धा ही दोन मुले आहेत. साकळाईच्या डोंगर पायथ्याशी आठ एकर कोरडवाहू शेती, मुलांनी खूप शिकून फाटक्या परीस्थितीला आकार द्यावा म्हणून संजय व नंदा यांनी मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचे रान केले. मात्र, आई वडिलांची परीस्थिती पाहून स्वप्नीलने बारावीतून शाळा सोडली आणि शेतीत काम सुरू केले. तर श्रद्धा ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिने इयत्ता पहिले ते सातवीपर्यंतचे शिक्षण कोरेगाव येथील प्राथमिक शाळेत तर दहावीपर्यंतचे शिक्षण चार किमी अंतरावरील चिखली येथील रामेश्वर विद्यालयात सायकलवर प्रवास करुन पूर्ण केले. त्यानंतर, नगर येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात अकरावी बारावी केली आणि पुणे येथील सिंहगड महाविद्यालयात इ अॅण्ड टी सीमध्ये इंजिनिअरींगची पदवी घेतली. इंजिनिअरींगचे पदवीत्तर शिक्षण घेण्यासाठी तिची अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एका विद्यापीठात निवड झाली आहे.श्रद्धा हिची गेल्यावर्षीच शिक्षणासाठी अमेरिकेत निवड झाली होती. मात्र, बॅंकांनी शैक्षणिक लोन नाकारले. याउलट शैक्षणिक लोन मिळवून देतो म्हणून एका एंजटाने संजय पवार यांना दोन लाख रुपयांस फसविले. पण, मुलीच्या शिक्षणासाठी वाटेल ते करण्याची तयारी संजय पवार यांनी ठेवली. यंदा मित्र आणि भावाच्या मदतीने श्रद्धाला शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याचे आई-वडिलांचे स्वप्न साकार झाले आहे. मोठ्या जिद्दीने अमेरिकेत शिक्षण घेण्याची संधी मिळालेल्या श्रद्धाचा कोरेगाव ग्रामस्थांनी हरिनामाच्या गजरात शुभेच्छा कार्यकम आयोजीत केला आहे.
देव माणूस भेटला श्रद्धाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 40 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. माझे नगर येथील मित्र सुनिल कराळे व माझे बंधू विजय पवार यांनी लाख मोलाची मदत केली. माझ्या भावाने स्वताची जमीन श्रद्धाच्या शिक्षणासाठी गहाण ठेवली. कराळेसारखे मित्र भेटले म्हणून माझ्या मुलीचे अमेरिकेत शिक्षण घेण्याचे ध्येय पूर्ण झाल्याचे भावनिक उद्गार काढताना श्रद्धाचे वडिल संजय पवार यांना अश्रू अनावर झाले.
भारतात उद्योग करणार माझ्या आई वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी डोक्यावर कर्जाचा डोंगर केला चुलत्यांनी साथ केली, त्यांना माझा सलाम आहे. अमेरिकेत शिक्षण घेऊन भारतात स्वत:चा उद्योग सुरू करण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी खूप कष्ट घेणार असून चिखली, कोरेगाव आणि येथील शाळा सुधारण्यासाठी काम करणार असल्याचे श्रद्धा हिने लोकमतशी बोलताना म्हटले.