२६ रुग्णांची कोरोनावर मात करत घरवापसी
घारगाव : कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी कोरोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. संगमनेर तालुक्यातील बोटा जिल्हा परिषद शाळेतील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या २६ रुग्णांनी सोमवारी कोरोनावर मात केल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद काँग्रेस गटनेते अजय फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली बोटा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बोटा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोविड केअर सेंटर (५ एप्रिल) सुरू करण्यात आले आहे. या आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील पॉझिटिव्ह निघालेले परंतु फारसा त्रास अथवा ऑक्सिजन देण्याची गरज नसलेल्या रुग्णांना या ठिकाणी ठेवण्यात येत आहे. बाधित रुग्ण आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिश कापसे व डॉ अमोल भोर यांच्या निगराणीखाली आहेत. २० दिवसांपूर्वी सुरू झालेल्या सेंटरमध्ये सहा चिमुकल्यांसह ८४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी २६ जणांना गुलाबाचे फूल देऊन फुलांचा वर्षाव करत घरी सोडण्यात आले.
या वेळी डॉ. अतिश कापसे, डॉ. अमोल भोर, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, उपसरपंच संतोष शेळके, पोलीस पाटील संजय जटार, शिवाजी शेळके, मिथुन खोंडे आदी उपस्थित होते.