शिर्डी : महाराष्ट्रात काँग्रेसला पोषक वातावरण आहे. गुजरात निवडणुकीचा राज्याच्या राजकारणावर सकारात्मक परिणाम होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केला़चव्हाण यांनी बुधवारी साई दर्शन घेतले. राहुल गांधी यांचा झंझावात व मेहनतीमुळेच काँग्रेसला गुजरातमध्ये भाजपाला रोखता आले. गेल्या निवडणुकीचा अपवाद वगळता महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. महाराष्ट्र काँग्रेसला झुकते माप देणारे राज्य आहे. काँग्रेस सर्व जाती धर्मांचे लोक असलेला पक्ष आहे़ प्रत्येकाने कोणत्या मंदिरात, मशिदीत किंवा गुरुद्वारात जायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे़ विकासकामावर भर देत देशाच्या एकात्मकतेसाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची काँग्रेसची भूमिका आहे, असे ते म्हणाले.मतांचे विभाजन करून स्वत:ची व्होट बँक मजबूत बनवण्याचे काम काँग्रेसने कधीही केले नाही. समान नागरी कायद्याबाबत मतमतांतरे आहेत़ हा कायदा जेव्हा करायचा असेल तेव्हा लोकभावनेचा विचार करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी अगोदर आपला जिल्हा सांभाळावा व मग राज्यात लक्ष द्यावे, असा सल्लाही चव्हाण यांनी दिला़निकालात ‘जीएसटी’ वजावट-गुजरात निवडणुकीत अमित शहांनी दीडशे जागा मिळण्याचा दावा केला होता. जनतेने २८ टक्के जीएसटी वजा करून त्यांना जागा दिल्याचा उपरोधिक टोलाही चव्हाण यांनी लगावला़ गेल्या सहा निवडणुकांच्या तुलनेत यंदा प्रथमच गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाची चांगली कामगिरी झाली, असे ते म्हणाले.
गुजरात निकालाचा राज्याच्या राजकारणावर सकारात्मक परिणाम : अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 2:23 AM