अकोले येथील कोरोना आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे रवी मालुंजकर यांनी गोंधळ घातल्यानंतर सोमवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. अजित नवले यांनी थोरातांवर हल्लाबोल चढवला. मंत्री थोरात यांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह लावतानाच रेमडेसिविर आणि ऑक्सिजन पुरवठ्यात दुजाभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
कोरोना आढावा बैठकीबाबत डॉ. नवले यांनी सोशल मीडियावरून भूमिका मांडली. संगमनेरच्या तुलनेत अकोलेला रेमडेसिविर व ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याबद्दल डॉ. नवले यांच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी अकोले येथे आंदोलन केले होते.
अकोले व संगमनेर असा वाद नाही. पण धाकट्या भावाच्या ताटात अधिक वाढणे, ही मोठ्या भावाची जबाबदारी असते. याची आठवण त्यांनी थोरातांना करून दिली. संगमनेरमध्ये सर्व काही अलबेल आहे, असेही नाही. मात्र, वेळ राजकारण करण्याची नाही. माणूस म्हणून उभे राहण्याची आहे, असेही त्यांनी सांगितले.
ज्यांनी कोरोना उपचाराबाबत आवाज उठवला. त्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बैठकीत टाळण्यात आले, असा आक्षेपही त्यांनी घेतला. या बैठकीला तुम्हाला अधिकृतरित्या बोलावता येणार नाही. कोविड सेंटरचे संचालक म्हणून तुम्ही आलात तर चालेल, असा निरोप आम्हाला अधिकारी देतात. मंत्री - संत्री आले म्हणून धावत सुटणारे लाळघोटे कार्यकर्ते आम्ही नाही. तुम्हाला आम्ही आंडू-पांडू वाटलो का, असा सवालही मालुंजकर यांनी केला. दरम्यान, त्यांचा हा सोशल व्हिडिओ तालुक्यात व्हायरल झाला आहे.