अहमदनगर : कोरोनामुळे यंदा जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा शुक्रवारी ऑनलाइन होत आहे. राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्कासह विविध उपकराचे कोट्यवधी रुपये आले नसल्याने पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पाला कात्री लागण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा शुक्रवारी (दि. २६) दुपारी ऑनलाइन होत असून, त्यात पुढील २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
राज्य सरकारकडे मुद्रांक शुल्कासह विविध उपकराचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. त्यामुळे पुढील वर्षाचे हे अंदाजपत्रक कोलमडण्याची शक्यता असून, त्याला साधारण १० ते १५ टक्के कात्री लागण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेचे २०१८-१९ चे मूळ अंदाजपत्रक ३९ कोटींच्या होते. त्यात पुढे खाजगी कंपन्यांची रस्ते खोदाई, गुंतवणुकीवरील व्याज, मुद्रांक शुल्कची ऐनवेळी आलेली रक्कम यामुळे हे अंदाजपत्रक ४७ कोटी ७२ लाखांवर गेले. त्या पुढील वर्षी २०१९-२० मध्ये मूळ अंदाजपत्रक ४९ कोटी १९ लाखांचे होते. त्यातही वाढ होऊन ते सुधारित ५३ कोटी २५ लाखांचे झाले. त्यानंतर मात्र चालू २०२०-२१ या वर्षीच्या अंदाजपत्रकाला कोरोनामुळे कात्री लागली. हे मूळ अंदाजपत्रक ४३ कोटी ९७ लाखांचे होते. नोव्हेंबर २०२०पर्यंत ते ३८ कोटी ५५ लाखांवर अंतिम झाले. चालू वर्षीप्रमाणे पुढील वर्षाच्या बजेटमध्येही कात्री लागण्याची शक्यता आहे.
---------------
सभेवर कोरोनाचे सावट
जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेवर कोरोनाचे सावट आहे. सभा ऑनलाइन होणार असली तरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सभेसाठी गर्दी होणार नाही याची खबरदारी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.