पारनेर : जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत पारनेरमध्ये सेवा संस्था मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान संचालक उदय शेळके व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले यांच्यातच लढत रंगण्याची शक्यता आहे. यामध्ये आमदार नीलेश लंके यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे विखे-औटी बँक निवडणुकीत एकत्र येणार असल्याचे निश्चित झाल्याचे कळते.
जिल्हा बँक निवडणूक मतदार यादी जाहीर झाली असून, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात गट व खासदार डॉ. सुजय विखे गट यांनी तयारी सुरू केली आहे. पारनेर सेवा संस्था मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे विद्यमान संचालक उदय शेळके हेच उमेदवार निश्चित मानले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याकडे निवडणूक समितीची जबाबदारी दिली आहे. आमदार नीलेश लंके हे बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून त्यांनाही एका मतदारसंघात उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. उदय शेळके यांनी निवडणूकनिमित्त पारनेर दौरा सुरू केला असून, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या माध्यमातून त्यांनी तीळगूळ वाटप कार्यक्रमासही हजेरी लावली.
जिल्हा बँक निवडणूकनिमित्त खासदार डॉ. सुजय विखे व शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांचे गट एकत्र येणार आहेत. यासाठी विखे यांच्याकडून राहुल शिंदे, सुजित झावरे यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते.
---
अनेकांची नावे चर्चेत
उदय शेळके यांच्या विरोधात लढण्यासाठी शिवसेनेकडून उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, भाजपकडून राहुल शिंदे आदींची नावे चर्चेत आहेत. यातून रामदास भोसले यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून, त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
---
राहुल झावरेंची भूमिका गुलदस्त्यात
पारनेरचे माजी आमदार, काँग्रेस नेते नंदकुमार झावरे, पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांच्याकडेही काही मतदार असल्याने, त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. ते विखे गटाकडे राहतात की स्वतंत्र निर्णय घेतात, हे महत्त्वाचे आहे. त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.