लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार हे गुरुवारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे महापालिकेचे आयुक्तपद रिक्त झाले असून, आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार पुढील आदेश येईपर्यंत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे. नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी याबाबत सायंकाळी आदेश जारी केला.
मायकलवार यांनी मार्चमध्ये महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. मार्च ते डिसेंबर, अशी दहा महिने त्यांनी आयुक्त म्हणून काम पाहिले. ते सेवानिवृत्त झाल्याने आयुक्तपद रिक्त झाले. नगरविकास खात्याकडून नवीन आयुक्तांची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे. आयुक्त मायकलवार हे कोरोनाच्या संकट काळात रुजू झाले. त्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. स्वत: शहरात फिरून मायकलवार यांनी महिती घेतली. शहराची माहिती नसतानाही प्रभावीपणे उपाययोजना केल्या. यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आयुक्तांचा अतिरिक्त पदभार होता. आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे सेवानिवृत्त झाल्याने आयुक्तपद रिक्त होते. द्विवेदी यांनी सर्वाधिक काळ महापालिका आयुक्तपदाचा पदभार संभाळला. मार्चपर्यंत त्यांच्याकडेच पदभार होता. त्यांच्या कार्यकाळात सीना नदीपात्रातील अतिक्रमणे, वाडियापार्क येथील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले, तसेच महापालिकेला स्वच्छतेत मानाचे मानांकन मिळाले. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने द्विवेदी यांनी अर्थसंकल्पातील ५० टक्के खर्चालाच परवानगी दिली होती.
..
नवीन आयुक्त कोण
महापालिका आयुक्तांची नियुक्ती हा विषय नगरविकास खात्याशी संबंधित आहे. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे नगर जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आयुक्तपद जास्त दिवस रिक्त राहणार नाही. शहराचे आमदार संग्राम जगताप हेही राष्ट्रवादीचेच आहेत. त्यांच्याकडून आयुक्तांची मागणी केली जाऊ शकते. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका सुरू असल्याने भोसले यांना महापालकेसाठी फारसा वेळ मिळणार नाही. महापालिकेच्या महत्त्वाच्या योजना आधीच रखडलेल्या आहेत.