शेवगाव : ग्रामीण डाक सेवकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील संपात सहभागी झालेल्या डाक सेवकांनी येथील तालुका प्रधान डाक कार्यालयासमोर शनिवारी बेमुदत धरणे आंदोलन केले. ग्रामीण डाक सेवकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.सातव्या वेतन आयोगा पोटी कमलेश चंद्र समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, ग्रामीण डाक सेवकांना खात्या अंतर्गत सामावून घेण्यात येवून पगार वाढ मिळावी यासह इतर महत्वपूर्ण मागण्यांसाठी ग्रामीण डाक नशनल युनियन संघटनेच्या आदेशान्वये २२ मे पासून पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे शेवगाव तालुक्यातील सर्व ३८ ग्रामीण डाक घर कार्यालयातील टपाल सेवेसह जलद पोस्ट, आरडी बचत, ठेवी, वीज बिल, ग्रामीण डाक विमा, एटीम, आधार, तिकीट, टेलीफोन बिल आदी सेवा विस्कळीत झाल्याने ग्रामीण परिसरातील डाक कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे.शेवगाव येथील तालुका कार्यालयात टपाल वाटपासाठी डाक सेवकांच्या असलेल्या दोन्ही जागा गेल्या काही महिन्यापासून रिक्त असल्याने या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दोन ग्रामीण डाक सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरील दोन्ही डाक सेवक बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याने शेवगाव शहरातील टपाल व्यवस्थेवरही संपाचा परिणाम झाला आहे. शेवगाव येथे उपविभागीय डाक कार्यालय कार्यरत असून उपविभागीय स्तरावरील शेवगाव तालुक्यातील ३८ व पाथर्डी तालुक्यातील ४३ अशा एकूण ८१ ग्रामीण डाक सेवक आंदोलनात सहभागी झाले आहेत. तालुक्यात ग्रामीण डाक सेवकांचे आंदोलन यशस्वी झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. शेवगाव तालुका डाक सेवक संघटनेचे राजेंद्र खेडकर, जीवन गजभिव, राम धस, मुरलीधर झाडे, हमीद शेख, अंशाबा मुटकुळे, जगन्नाथ काकडे, मोहन तमानके, कृष्णा पाऊलबुद्धे, बाळू पाथरकर, मुरलीधर झाडे, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.