कोपरगाव : तालुक्यातील चासनळी येथील पोस्टमास्तरांनी सुमारे ५० ते ६० कावळ्यांच्या तावडीतून एका पक्ष्याला पर्यावरण दिनी जीवदान देवून अनोखी जबाबदारी पार पाडली. दरम्यान, हा पक्षी शराटी जातीचा आहे, असे कोपरगावचे वनपरीक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले.
शुक्रवारी(दि.५) पोस्टमास्तर सोमनाथ तांगतोडे हे नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास टपाल कार्यालयात चालले होते. यावेळी पोस्टाच्या बाहेर सुमारे ५० ते ६० कावळे एका सुंदर शराटी जातीच्या पक्ष्याला आपल्या चोचीने टोचा मारत होते. यात हा पक्षी जखमी झाला होता.
यावेळी तांगतोडे यांनी त्या कावळ्यांना हुसकविण्याचा प्रयत्न केला. कावळ्यांनी तांगतोडे यांच्यावरही हल्ला चढवला. मात्र अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर तांगतोडे यांनी त्या पक्ष्याला कावळ्यांच्या तावडीतून सोडविले. त्यांनी या पक्ष्याला आपल्या कार्यालयात ठेवले. त्यांनी गावचे सरपंच निळकंठ चांदगुडे व वनअधिकारी संजय गिरी यांना सदर घटनेची माहिती दिली. ते घटनास्थळी दाखल झाले.
शराटी जातीचा हा पक्षी दोन दिवसांपुर्वी झालेल्या वादळात दिशा भरकटून आलेला असावा असा प्राथमिक अंदाज यावेळी वनविभागाचे गिरी यांनी व्यक्त केला. या पक्ष्यावर उपचार करुन त्यास निसर्गात मुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.