श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक अशोक खेंडके यांना जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांनी अपात्र केले होते. याविरोधात अशोक खेंडके यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे अपील केले होते. जिल्हाधिकारी यांच्या निर्णयास नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे अशोक खेंडके यांना दिलासा मिळाला आहे.
अशोक खेंडके हे श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ ब मधून अख्तर शेख यांचा पराभव करून निवडून आले. त्यावर अख्तर शेख यांनी श्रीगोंदा काष्टी रोडवरील अशोक खेंडके यांच्या अतिक्रमणाचा धागा पकडून जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांच्याकडे अपील केले होते. अख्तर शेख यांच्या तक्रारीची दखल घेऊन अशोक खेंडके यांना जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांनी अपात्र केले. त्यावर अशोक खेंडके यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे अपील केले.
अशोक खेंडके यांच्या अपिलाची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्या निर्णयास सोमवारी स्थगिती दिली. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. अशोक खेंडके म्हणाले, माझे अतिक्रमण नसताना जिल्हाधिकारी यांनी राजकीय दबावाखाली अपात्रतेची कारवाई केली. पण नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी न्याय दिला. त्यांचा मी आभारी आहे.