श्रीगोंदा : कुकडीचे शेती सिंचन आवर्तन चालू आहे. शेतकऱ्यांच्या पिकाकडे दुर्लक्ष करून कुकडीच्या अधिकारी-कर्मचारी यांनी संगनमत करून कि.मी. १३२ वरील जोड कालवा श्रीगोंदा शिवारात फोडून एका तलावात पाणी सोडण्याचा अजबपणा केला आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
लोणी व्यंकनाथ, घारगाव, पारगाव, श्रीगोंदा, बाबुर्डी, शिरसगाव, म्हातारपिंप्री शिवारातील शेतकरी कुकडीच्या पाण्याची अतुरतेने वाट पाहत आहेत. अनेकांची पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. अधिकारी शेतकऱ्यांना थेट पाणी न देता तलावात पाणी सोडण्याचे उद्योग चालू आहेत.
कुकडीचे आवर्तन फक्त शेती सिंचनासाठी आहे. कोणत्याही तलावात पाणी सोडू नये, असे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले आहे. मात्र अधिकाऱ्यांनी या निर्णयाला केराची टोपली दाखवली आहे.
----
चौकशी करणार..
श्रीगोंदा शिवारात कालवा कोणी फोडला. तलावात पाणी कसे सोडले, याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे अधीक्षक अभियंता
हेमंत धुमाळ यांनी सांगितले.
---
अधिकाऱ्यांना निलंबित करा..
शेतकऱ्यांना पाणी देण्यास टाळाटाळ करून श्रीगोंदा शहर शिवारात कालवा फोडून तलावात कोणी, कसे पाणी सोडले याची अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी राजेंद्र काकडे यांनी केली.
---
०४ कुकडी
श्रीगोंदा शहर परिसरात कुकडीच्या कालव्याचे तलावात सोडलेले पाणी.