श्रीगोंदा : येथील कापसे बंधाऱ्यावरून पाणीउपसा करणाऱ्या विद्युत पंपाचे वीज कनेक्शन शनिवारी तोडल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वीजबिलाच्या वसुलीसाठी महामंडळाकडून कारवाईचे संकेत दिले होते.
राज्यभर हा विषय गाजत असताना याची कारवाई महावितरण कंपनीने केली आहे.
साळवनदेवी मंदिर परिसरात सरस्वती नदीवर कापसे बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यावर परिसरातील मोठी शेती अवलंबून आहे. या बंधाऱ्यावरून उपसा सिंचनद्वारे पाणी शेतापर्यंत आणले जाते. शेतकऱ्यांचे येथे वीज कनेक्शन आहे. वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणचे कर्मचाऱ्यांनी बंधाऱ्यावर जाऊन येथील सर्व कनेक्शन तोडले. याबाबत वीज मंडळाच्या काही कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना ही माहिती दिली.
उन्हाळ्याच्या पूर्वसंध्येला पाण्याचे नियोजन, पिकांचे उत्पन्न व आर्थिक जुळवाजुळव आदींसाठी महत्त्वाचे दिवस असणाऱ्या काळातच वीजतोडणी झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. याबाबत शेतकऱ्यांना सवलत देऊन मदतीची अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.
.....
कापसेवस्ती बंधाऱ्यावर परिसरातील सुमारे चार हजार एकर शेती अवलंबून आहे. येथील शेतकऱ्यांचे सुमारे १५० कनेक्शन तोडण्यात आले. कांदा, गहू, हरभरा, ऊस, लिंबू आदी पिके शेतात उभी आहेत. कोरोनाच्या काळातून शेतकरी सावरत असताना ही कारवाई जखमेवर मीठ चोळणारी आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. यावर तोडगा न निघाल्यास मोठे आंदोलन उभे केले जाईल.
-दादासाहेब कोथिंबीरे, अध्यक्ष, साळवनदेवी सेवा संस्था,श्रीगोंदा.
....