अहमदनगर : महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांमधील कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. मात्र, त्यांचा अद्याप पगार झाला नसल्याने सर्व कंत्राटी कामगार मंगळवारी निषेध करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हाध्यत्र ए. एम. लांडगे यांनी पत्रकात दिली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीत सुमारे ३२ हजार वीज कंत्राटी कामगार नियमित रिक्त पदांच्या जागेवर मागील १५ ते २० वर्षे कार्यरत आहेत. मागील वर्षभर कोरोनाकाळात या कामगारांनी वीजनिर्मिती, वीजवहन, वीज वितरण करत आपला जीव धोक्यात घालून विक्रमी महसूल गोळा करून दिला आहे. राज्याला अखंडित व सुरळीत वीजपुरवठा सेवा देताना ४० कंत्राटी कामगारांचा अपघातात मृत्यू झाला. मात्र, त्यांच्याकडे शासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. औरंगाबाद रेल्वे अपघातात परप्रांतीयांना ५ लाख, मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसाला १० लाख तर भंडारा, विरार, नाशिकसारख्या दुर्घटनेतील मृत रुग्णांच्या नातेवाईकांना ५ ते १० लाख रुपये शासनाने दिले. ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगारांनी या राज्याला महसूल मिळवून दिला, अखंडित व सुरळीत वीज सेवा दिली हा त्यांचा गुन्हा आहे का ? काम करून पगारासाठी कामगारांना दोन-तीन महिने ताटकळत बसावे लागत आहे. याला जबाबदार कोण ? असा सवाल पत्रकात करण्यात आला आहे.