शेवगाव : तालुक्यातील खानापूर शिवारात वीज कोसळून लागलेल्या आगीत दोन एकर क्षेत्रातील ऊस, ठिबकचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.
शनिवारी दुपारी जोराचा वारा, ढगांच्या गडगडाटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. खानापूर शिवारातील शेतकरी मच्छिंद्र विश्वनाथ थोरात यांच्या गट नंबर ७२ मधील शेतात सायंकाळी सातच्या सुमारास वीज कोसळल्याची घटना घडली. वीज कोसळून लागलेल्या आगीत दोन एकर ऊस व ८० हजारांचे ठिबक सिंचनचे साहित्य खाक झाले. वीज पडलेल्या ठिकाणापासून अगदी जवळच गोबरे वस्ती, थोरात वस्ती असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून, शेतकऱ्याला तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी प्रहार संघटनेचे कल्पेश दळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
---
२१ खानापूर
खानापूर येथील शेतकऱ्याचा वीज पडून जळालेला ऊस.