पारनेर (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीमध्ये नऊ जागांवर ग्रामविकास पॅनलने सत्ता काबीज केली. साड्या वाटप करून प्रलोभने देणाऱ्या श्यामबाबा पॅनलच्या उमेदवारांना मतदारांनी साफ नाकारले. राळेगणसिद्धीमध्ये माजी सरपंच जयसिंग मापारी, माजी उपसरपंच लाभेष औटी, अण्णा हजारे यांचे माजी स्वीय सहायक सुरेश पठारे व दत्ता आवारी यांनी ग्रामविकास पॅनलची मोट बांधली होती. या पॅनलने सर्वच्या सर्व नऊ जागा जिंकल्या आहेत. विरोधी श्यामबाबा पॅनलला एकही जागा मिळविता आली नाही. नऊपैकी दोन जागा बिनविरोध निघाल्या होत्या.
नेहमीप्रमाणे गावात निवडणूक बिनविरोध करायचे ठरले होते. त्यासाठी आमदार नीलेश लंके यांनीही पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी निधी देण्याची योजनाही जाहीर केली होती. पहिल्या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याला संमतीही झाली होती. मात्र, नंतर काही मंडळींनी हजारे यांच्याकडे जाऊन निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. आम्हाला लोकशाही कळावी, यासाठी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. हजारे यांनीही त्यांना समंती दिली. त्यानंतर श्यामबाबा पॅनलच्या उमेदवारांनी मतदारांना प्रलोभने देण्याचा प्रकारही घडला. तरीही मतदारांनी त्यांना धुडकावले.