करंजी : पाथर्डी तालुक्यातील कौडगाव, त्रिभूवनवाडी, निंबोडी, खांडगावसह परिसरातील कृषी पंपांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतक-यांनी गुरूवारी सकाळी नऊ वाजता नगर - पाथर्डी महामार्गावरील त्रिभूवन फाट्यावर सुमारे अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. शेतक-यांच्या तीव्र भावना पाहून महावितरणने खंडित वीजपुरवठा पूर्ववत केला.सतत पाच वर्षापासून दुष्काळ असलेल्या या भागात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने विहिरींना पाणी आहे. ऐन भरण्याच्या वेळी शेतकºयांना कोणतीही पूर्व सुचना न देता कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे शेतक-यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. चर्चा नको, आधी वीज जोडा, अन्यथा आम्हाला अटक करा, गोळीबार करा, आम्ही रस्त्यावरून उठणार नाही, अशी भूमिका शेतक-यांनी घेतली. संतप्त शेतक-यांनी महावितरणच्या अधिका-यांना धारेवर धरले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने तसेच शेतक-यांच्या तीव्र भावना पाहून नायब तहसीलदार पंकज नेवसे व महावितरणचे पाथर्डीची उपअभियंता आडभाई यांनी वरिष्ठांशी संपर्क करून वीज जोडून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.पृथ्वीराज आठरे, संभाजी वाघ, राजेंद्र पाठक, सुनील कारखेले, साहेबराव भापसे, शिवाजी कारखेले, रमेश कारखेले व इतरांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला. पृथ्वीराज आठरे, संभाजी वाघ, ज्योतिबा आठरे, मच्छिंद्र सावंत, शिवाजी कारखेले, रमेश कारखेले, सुनील कारखेले, रघुनाथ कारखेले, साहेबराव भापसे, राजेंद्र पाठक यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
नगर-पाथर्डी महामार्ग अडविताच शेतक-यांना मिळाली वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 5:40 PM