बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील हातगाव व कांबी येथील शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांपासून शेतीपंपासाठी दिवसाआड वीजपुरवठा होतो. यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी पाॅवर ट्रान्सफाॅर्मर व शेतीपंप फिडरची मागणी करत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी थेट ऊर्जामंत्र्यांना साकडे घातले आहे.
हातगाव व कांबी येथील शेतकऱ्यांना हातगाव वीज उपकेंद्रातून शेतीपंपासाठी वीजपुरवठा केला जातो; परंतु साधारणतः मागील दोन वर्षांपासून दिवसाआड वीजपुरवठा होतो. तोही अर्ध्या-एक तासाला खंडित होत असल्याने पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. यामुळे येथील शेतकऱ्यांनी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी मागील आठवड्यात रास्ता रोकोचा इशारा दिला होता. त्यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून ओव्हरलोड समस्या टाळण्यासाठी हातगाव वीज उपकेंद्रात ५ एमव्हीएचा अतिरिक्त पाॅवर ट्रान्सफाॅर्मर व शेतीपंपाचे फिडर गरजेचे असून त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयास पाठवल्याचे निदर्शनास आणून दिले. तेव्हा शेतकऱ्यांनी रास्ता रोकोचा निर्णय स्थगित केला. त्यानंतर शनिवारी (दि.२७) ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची राहुरी येथे प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांनी विजेची समस्या व पिकांच्या नुकसानींबाबत व्यथा मांडली. तसेच निवेदनाद्वारे पाॅवर ट्रान्सफाॅर्मर व शेतीपंप फिडरची मागणी केली.
यावेळी ऊर्जामंत्र्यांनी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतो, असे आश्वासित केल्याचे शेतकरी नीलेश ढाकणे यांनी सांगितले. यावेळी डाॅ. नीलेश मंत्री, एकनाथ सुसे, बाजीराव लेंडाळ, डाॅ. गोकुळ दिवटे आदी शेतकरी उपस्थित होते.