दीड तासात अधिकाऱ्यांनी आणला पंचप्राण
अखेरचा श्वास घेत असलेल्या रुग्णांना मिळाला प्राणवायू
अहमदनगर : नगर शहरात २० एप्रिल रोजी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. बहुतांशी रुग्णालयात अवघा एक ते दीड तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक राहिला होता. उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवायचे कसे असा प्रश्न डॉक्टरांसमोर होता. डॉक्टरांची धावाधाव सुरू झाली होती. अशा परिस्थितीत तीन अधिकाऱ्यांनी रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी उद्योजकांच्या मदतीने ऑक्सिजनरुपी संजीवनी रुग्णालयांमध्ये पोहोच केली अन् रुग्णांचे प्राण वाचिवले.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे, तहसीलदार उमेश पाटील व कॉन्स्टेबल देवेंद्र पांढरकर यांनी उद्योजकांच्या मदतीने अवघ्या दीड तासात ४२ ऑक्सिजन सिलेंडर व एक दिडशे किलोची ऑक्सिजन ट्रॉली रुग्णालयांना उपलब्ध करून दिल्याने अखेरचा श्वास घेत असलेल्या अनेक रुग्णांचे प्राण वाचले.
नगर शहरातील बहुतांशी रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपल्याने अनेक रुग्णांचा प्राण कंठाशी आला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने ऑक्सिजन उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची बाब नगर तालुक्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांना सांगितली. एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये असलेले ऑक्सिजन सिलेंडर जमा करून ते हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेण्यात आला. सहाय्यक निरीक्षक आठरे, तहसीलदार पाटील व कॉन्स्टेबल पांढरकर यांनी २० एप्रिल रोजी रात्री ९ ते साडेदहा अशा अवघ्या दीड तासात ४२ ऑक्सिजन सिलेंडर व इंडियन सीमलेस या कंपनीतून दीडशे किलोची ऑक्सिजनची ट्रॉली उपलब्ध केली. ज्या हॉस्पिटलमधील रुग्णांना तत्काळ ऑक्सिजनची गरज आहे, त्यांना बोलावून त्यांच्याकडे हे सिलेंडर देण्यात आले. या सिलेंडरमुळे हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेत असलेल्या रुग्णांना प्राणवायू मिळाला.
...............
उद्योजकांचा सकारात्मक प्रतिसाद
रुग्णांना तत्काळ ऑक्सिजनची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर उद्योजकांनीही तत्काळ प्रतिसाद देत आपल्या कंपन्यांमधील ऑक्सिजन सिलेंडर काढून दिले. काही उद्योजकांनी आपले कामकाज पूर्णपणे बंद ठेवून रुग्णांसाठी ऑक्सिजन दिला. हा ऑक्सिजन शहरातील ७ महत्त्वाच्या कोविड रुग्णालयांना पुरविण्यात आला. त्यामुळे तेथील रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश आले.