कर्जत : भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्ष प्रतिभा नंदकुमार भैलुमे यांची कर्जत नगरपंचायतीच्या दुसऱ्या नगराध्यक्षा म्हणून बुधवारी शिक्कामोर्तब झाले. मावळते नगराध्यक्ष नामदेव राऊत यांची नूतन उपनगराध्यक्षपदी निवड झाली. दोन्ही निवडी बिनविरोध होऊन नगरपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकला.प्रांताधिकारीतथा निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत नगरपंचायतीच्या सभागृहात निवड बैठक झाली. नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित होते. भैलुमे या प्रवर्गातील एकमेव नगरसेविका असल्याने त्यांचा एकमेव दाखल होता. उपनगराध्यक्ष पदासाठी मावळते नगराध्यक्ष राऊत यांचा तर काँग्रेसच्या वतीने मोनाली ओंकार तोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यांनी माघार घेतल्यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या निवडी बिनविरोध झाल्या. यावेळी नगरसेविका मनीषा सोनमाळी, हर्षदा काळदाते, वृषाली पाटील, राणी गदादे, राखी शहा, निता कचरे, उषा राऊत, मंगल तोरडमल, नगरसेवक बापूसाहेब नेटके, सुधाकर समुद्र, लालासाहेब शेळके, तारेक सय्यद उपस्थित होते. या निवडीनंतर पालकमंत्री राम शिंदे यांनी नूतन पदाधिकाºयांचे अभिनंदन केले.