लोणी : जगभरात आलेल्या कोरोना-१९ या संकटाच्या विरोधात आता ग्रामीण भागही लढाईसाठी सज्ज झाला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवरा ग्रामीण रुग्णालय व प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाने लोणी येथे आधुनिक सुविधांनी युक्त असे ‘कोविड-१९’ च्या शंभर खाटांचे हॉस्पिटल अवघ्या सहा दिवसात उभे केले. गुरूवारी ( २ एप्रिल) हे १०० खाटांचे हॉस्पिटल महाराष्ट्राला समर्पित केले, अशी माहिती संस्थेचे प्रभारी कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी दिली. प्रवरा ग्रामीण रुग्णालय व प्रवरा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस गेली ४५ वर्ष ग्रामीण भागात आरोग्य सेवेत कार्यरत आहे. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून सुरु केलेले हे रुग्णालय नंतरच्या कालखंडात पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी गरीब माणूस केंद्रबिंदू ठेवून चालवले. त्याला आधुनिकतेची जोड दिली. हे रुग्णालय नगर, नाशिक, औरंगाबाद, बीड तसेच इतर जिल्ह्यातील गरीब गरजू रुग्णांसाठी आरोग्य सेवेचे कार्य करते. देशात ग्रामीण भागात सेवा देणारी तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे एकमेव रुग्णालय म्हणून प्रवरा ग्रामीण रुग्णालयाची ओळख आहे. सामाजिक बांधिलकीतून आपण हे ‘कोविड-१९’ हॉस्पिटल चा उपक्रम राबविला असल्याचे संस्थेचे प्रभारी कुलपती डॉ. राजेंद्र विखे यांनी सांगितले.
प्रवरा मेडिकल ट्रस्टने अवघ्या सहा दिवसात उभारले ‘कोविड-१९’ चे नवीन हॉस्पिटल; महाराष्ट्राला केले समर्पित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 2:32 PM