श्रीरामपूर : येथील बसस्थानकामधून बस बाहेर पडण्याच्या दोन्ही दिशेला मोकाट जनावरे उभी राहतात. त्यामुळे प्रवाशांसह बसला स्थानकामध्ये प्रवासाला अडचण होत आहे. मात्र कर्मचाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
मोकाट जनावरांना बसस्थानकाचे आवार ही शहराच्या मध्यभागी जागा उपलब्ध झाली आहे. ते बिनदिक्कतपणे येथे वावरतात. मात्र प्रवासी व बसला व्यत्यय येतो. बस वाहकांना गाडीचा हॉर्न वाजवत प्रवेश करावा लागतो.
या मोकाट जनावरांच्या मालकांचा पत्ता लागत नाही. त्यामुळे त्यांना फक्त हाकलवण्याशिवाय पर्याय नाही. जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने कोंडवाड्यात करावा अन्यथा त्यांच्या मालकांचा शोध घेऊन दंड अकारावा, त्यांना ताकीद द्यावी अशी मागणी केली जात आहे.
पालिकेचा पूर्वी नेवासा रस्त्यावर कोंडवाडा होता. मात्र अनेक वर्षापासून हा कोंडवाडा बंद पडला आहे. जनावरांच्या चारा पाण्यासाठी अर्थ संकल्पात तरतूद करावी लागते. मात्र ही तरतूदही बंद करण्यात आली आहे.
यासंदर्भात आगार प्रमुख राकेश शिवदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परिवहन महामंडळ तोट्यात आहे. त्यामुळे कर्मचारी भरती नाही. जनावरे बसस्थानक आवारातून हाकलून देण्याचे काम कठीण आहे. तरीही जनावरे आवारात थांबणार नाही, याची दक्षता घेऊ असे सांगितले.
----------