शिर्डी : जवळपास साडेतीन महिन्यांपासून बंद असलेले साईमंदिर भाविकांसाठी खुले करण्यासाठी साईसंस्थानने प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे़ राज्य शासनाची अनुमती येताच भाविकांच्या सुरक्षेचे सगळे नियम पाळून भक्तांसाठी दर्शन सुरू करता येईल, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली़.
सुरूवातीच्या काळात तासाभरात तीनशे ते साडेतीनशे म्हणजे प्रत्येक मिनिटाला चार ते पाच भाविक दर्शन घेऊ शकतील़ ठराविक वेळेनंतर दर्शनरांगा, रेलिंग सॅनिटाईज करावे लागणार आहेत़ त्यामुळे दर्शनाचा कालावधी जवळपास दहा तासांचा असेल़ तीन ते साडेतीन हजार भाविक दिवसभरात दर्शन घेऊ शकतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे़.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संस्थानकडून प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहे़ यात दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांचे शरीराचे तापमान मोजणे, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पाळणे या सारख्या आवश्यक त्या सुविधा करण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाकडून आदेश आल्यानंतर साईमंदिर भाविकासाठी खुले करण्यात येईल. तसेच पासधारक भाविकांना टाईम दर्शनाच्या माध्यमातून नियोजनबद्ध दर्शन घडवण्यात येईल, असेही डोंगरे म्हणाले. ---अर्थचक्र थांबले गेल्या १७ मार्चपासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे़ भाविकाविनाच मंदिरात पूजा, आरत्या, उत्सव सुरू आहेत़ भाविकांनी गजबजून जाणारी साईनगरी सध्या भक्ताविना ओस पडली आहे़ याशिवाय येथील अर्थचक्रही पूर्णपणे थांबले आहे़ संस्थानने जरी मंदिर उघडण्याची व भाविकांना दर्शन घडवण्याची पूर्ण तयारी केली असली तरी अद्याप शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे़