अहमदनगर : पारंपरिक पिके ही नष्ट होत चालली आहेत. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. पारंपरिक पिके ही मानवाच्या आरोग्यासाठी गुणकारी आहेत. परंतु ते आता नामशेष होत चालली आहेत. समाजामध्ये वाढणारे मधुमेहाचे प्रमाण व त्यावर जांभूळ हे एक उत्तम औषध म्हणून त्याचा वापर केला जातो. त्यामुळे जांभुळाचे जतन करण्याची गरज आहे, असे मत आत्माचे संचालक भाऊसाहेब ब-हाटे यांनी मांडले.बाळापूर इंदरी (आश्वी) येथे शैलजा नावंदर यांनी सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या जांभूळ पिकाच्या बागेस आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब ब-हाटे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. नावंदर यांनी ५०० जांभूळ झाडांची लागवड करून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने त्याचे जतन केले.यावेळी शैलजा नावंदर म्हणाल्या, १९८० पासून शेती व्यवसायास सुरुवात केली. हा व्यवसाय करताना उत्पादन खर्च कमी करणे व जमिनीचा सुपिकता टिकविणे हे मोठे आव्हान पुढे होते. आज शेती उत्पादन घेण्यासाठी खूप रासायनिक खते, भरपूर कीटकनाशके व संप्रेरके यांचा वापर केला जातो. त्यामुळे एकीकडे शेतीचा उत्पादन खर्च वाढतो, तर दुसरीकडे उत्पादनाचा दर्जा घसरतो आहे. दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज आमच्याकडे ५०० झाडांची इको फ्रेंडली बाग तयार झाली असून, जांभूळ पिकाचे व्यवस्थापन पूर्ण सेंद्रिय पद्धतीने करतो. झाडांचा पडलेला पालापाचोळा त्याच झाडाखाली गाडला जातो. किटकनाशकांपासून संरक्षण करण्यासाठी निंबोळी तेल, करंज तेल, दशपर्णी अर्क या सेंद्रिय निविष्टांचा वापर केला जातो. चिकट सापळे, कामगंध सापळे, प्रकाश सापळे याचा वापर केला जातो. त्यामुळे सेंद्रिय शेतीच्या दजेर्दार फळांचे व विषमुक्त फळांचे उत्पादन आम्ही घेतो. या कामाची पावती म्हणून एफएओ यांच्या वतीने देण्यात येणारा मॉडेलिंग फॉर्मर आॅफ इंडिया हा पुरस्कार बँकॉक येथे भारताला ९ वर्षांनंतर आमच्या रूपाने मिळाला, असे सांगितले.यावेळी कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, सुनील बोरुडे, पोपटलाल नावंदर आदी उपस्थित होते.